विधानसभा 2019 : ‘एन्काऊंटर’ स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलातून राजकारणात प्रवेश केलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचा एबी फॉर्मही त्यांना देण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शर्मा यांना एबी फॉर्म दिला असून ते नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज मातोश्रीवर प्रदीप शर्मा यांना शिवसेनेचा एबी फॉर्म देण्यात आला. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गुन्हेगारांना कंठस्नान घातले आहे. उत्तर प्रदेशात जन्मलेले प्रदीप शर्मा हे महाराष्ट्रातील धुळे येथे वाढले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदीप शर्मा म्हणाले, नालासोपारा परिसराचा न झालेला विकास करण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरत आहे. उद्धव ठाकरे यांनी मला येथे निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी निवडणूक लढवणार असून, नवा नालासोपारा घडवण्यासाठी मी रिंगणात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : policenama.com