अपक्ष आमदार बच्चूकडू मातोश्रीवर, ‘शिवबंधन’ बांधणार असल्याची चर्चां

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून केले जाणारे दावे-प्रतिदावे वाढत असून अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच अपक्ष आमदार बच्चू कडू हे शिवसेनेच्या संपर्कात असून आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने ते शिवसेनेत जातात की काय अशा उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत.

दरम्यान बच्चू कडू हे अपक्ष आमदार असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघात अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके समाविष्ट आहेत. मतदारसंघाचे वैशिष्ठय असे की, या मतदारसंघाच्या निर्मितीपासून बराच काळ याठिकाणी अपक्षच निवडून येत असल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत या मतदारसंघात १२ विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यापैकी ६ वेळा अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. बच्चू कडूही सलग ३ वेळाअपक्ष म्हणून निवडून येत मागील १५ वर्षांपासून नेतृत्व करत आहे.

बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण :
बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर या भेटीत उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता, अनेकजण ते शिवबंधन हाती बांधनार असल्याचा दावा करत होते. मात्र, बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी फक्त प्रहार या संघटनेच्या कामासंदर्भातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You might also like