विधानसभा 2019 : पारनेरमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष औटींना लंकेंचे ‘आव्हान’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांचे वर्चस्व आहे. त्यांनी मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. आता शिवसेनेकडून विधानसभेला तेच राहतील. परंतु यावेळी औटी यांना त्यांच्या विजयात वाटा असलेल्या निलेश लंके यांचे मोठे आव्हान आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघात पारनेर तालुका व नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. नगर एमआयडीसीतील काही भागही या मतदारसंघात येतो. त्यामुळे नगर तालुक्यातील मतदार निर्णायक आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याच मतदारसंघातील आहेत.

लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. युती जर झाली नाही तर भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हेही विधानसभेच्या आखाड्यात उतरू शकतात. पारनेर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु गेल्या तीन टर्म मध्ये शिवसेनेच्या विजय औटी यांच्या रूपाने हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून आला होता, तो पारनेर मतदारसंघातून. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायमच झुकते माप देण्याचा प्रयत्न केला. त्यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उभे केले होते. परंतु ऐनवेळी अर्ज माघारी घेतला गेला होता.

विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून विजय औटी यांना संधी देण्यात आली. त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र उपाध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले. औटी यांच्या अभ्यासूपणामुळे त्यांचे मुंबईत वजन वाढत आहेत. मात्र त्यांचा स्वभाव स्थानिक पातळीवर अनेक जवळच्‍या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेऊ लागला आहे. काम करणारा आमदार, अशी त्यांची ओळख आहे. पैशाची उधळपट्टी न करता कामाच्या जोरावर मागील विधानसभा निवडणुकीत आमदार झाल्याचे जिल्ह्याताल ते एकमेव उदाहरण असावे, असे सांगितले जाते. त्यांच्या विजयात मागच्या वेळी निलेश लंके यांचे महत्त्वाचे योगदान होते. यावेळेस लंके त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाऊ लागल्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. राज्यात भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर झावरे हे भाजपचे उमेदवार असतीलय त्यामुळे कदाचित तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. औटी यांना लंकेचे आव्हान असल्याने ही निवडणूक त्यांना वाटते तितकी सोपी जाणार नाही.

लंके यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जोरदार लॉबिंग व शक्ती प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. औटी काम करणारा आमदार, असे मानले जात असले तरी त्यांचा तिरसट स्वभाव हा लोकांना तापदायक ठरू लागला आहे. त्यामुळे अनेक जवळचे कार्यकर्तेही औटी यांच्यावर नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र त्यांना विखेंची चांगली साथ मिळोल.

Visit : Policenama.com