विधानसभा 2019 : शिवसेनेकडून उमेदवारांना AB फॉर्मचे वाटप, पिंपरीतून अ‍ॅड. गौतम चाबुकस्वारांना उमेदवारी

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना-भाजप युतीमध्ये अद्याप कोणताही तोडगा निघाला नसताना शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. एबी फॉर्मचे वाटप करताना शिवसेने काही ठिकाणचे अपवाद वगळता मागील वेळी निवडून आलेल्या उमेदवारांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी देत त्यांना एबी फॉर्म दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई वगळता इतर ठिकाणच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. युती होण्याआधीच शिवसेनेने एबी फॉर्मचे वाटप केल्याने युती होणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान नवी दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. त्यात युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल भाजपसोबतच्या युतीवर भाष्य केलं. शिवसेना-भाजप युती होणारच आहे. त्याबाबत आमचा निर्णय आधीच झाला आहे. सध्या केवळ जागावाटपावर चर्चा सुरू आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

Visit : policenama.com