विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याच दरम्यान अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी ट्विट करुन दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्क आली आहे. मी सध्य ठणठणीत आहे, आपण काळजी करु नये, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांची कोरोना चाचणी गुरुवारी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. केदार हे मंगळवारी नागपूरात होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात पाऊस पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले. गुरुवारी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटू लागले. गुरुवारी दुपारी ते ब्रिच कॅण्डी रुग्णालयात गेले व कोरोनाची ॲन्टीजन चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह येताच ते तेथेच उपचारासाठी भरती झाले.