भाजपकडून 7 उमेदवारांची 4 थी यादी जाहीर, दिग्गजांचा पत्ता कट तर एकनाथ खडसेंचा ‘मान’ राखला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि राजपुरोहित यांचे तिकीट कापण्यात आले असून मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे नाव जाहीर झाले आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपाने आज चौथी यादी जाहीर करताना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या जागी बोरवली मधून सुनिल राणे यांना उमेदवारी दिली आहे.

माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करुन तेथून पराग शहा यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपावासी झालेले राहुल नार्वेकर यांना कुलाबा येथून उमेदवारी देताना राज पुरोहित यांना डावलण्यात आले आहे.

तुमसर मधील विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना विनयभंग प्रकरणात नुकतीच अटक झाली होती. त्यामुळे त्यांना वगळून प्रविण बडोले यांना तिकीट देण्यात आले आहे. काटोल मतदारसंघातून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंत्री बावनकुळे यांनी पसंती दिलेला कामटी मतदारसंघातून अजूनही कोणाचीही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही़ त्यामुळे ते अजूनही वेटिंगवर आहे.

उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ पुढीलप्रमाणे –

1) रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
2) चरणसिंग ठाकूर – काटोल
3) प्रदीप पाडोळे – तुमसर
4) अ‍ॅड. राहूल ढीकळे – नाशिक पूर्व
5) सुनिल राणे – बोरिवली
6) पराग शहा – घाटकोपर पूर्व
7) राहुल नार्वेकर – कुलाबा