हडपसरमध्ये तिरंगी ! योगेश टिळेकर की वसंत मोरे की अजून कोणी ? शिवसैनिक ‘किंगमेकर’, जाणून घ्या सद्यस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पाच वर्षात सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असलेले आमदार योगेश टिळेकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेने टिळेकर यांचे कट्टर विरोधक नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने हडपसर मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. कॉंग्रेस आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असून त्यांच्याकडून शहरअध्यक्ष चेतन तुपे आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांची नावे चर्चेत आहेत. सामाजिक गणिताच्या आधारावर या मतदारसंघामध्ये माळी, मराठा अशी चुरस नेहमीच पाहायला मिळत असून बहुसंख्य असलेला मुस्लिम समाज आणि नाराज शिवसैनिक कोणाच्या पाठीशी राहाणार यावर हडपसरचा पुढील आमदार ठरणार, असे चित्र सध्या तरी आहे.

भाजप आणि शिवसेना युती जाहीर झाली असून हक्काचा मतदारसंघ न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. शहरातील किमान आठपैकी हडपसर मतदारसंघ आपल्या पदरात पडेल या आशेने शिवसेनेच्या इच्छुकांनी जोरदार ताकद लावली होती. परंतू मतदारसंघ भाजपकडे गेल्याने संतप्त शिवसैनिकांनी मुंबईत मातोश्रीसमोर ठिय्या मांडला आहे. येत्या एक दोन दिवसांत हा संताप कमी झाला तरी शिवसैनिक योगेश टिळेकर यांच्यासाठी प्रचार करतील, ही शक्यता धूसर आहे. दुसरीकडे मनसेचे तिसर्‍यांदा नगरसेवक झालेले गटनेते वसंत मोरे यांनी टिळेकर यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीपासून मोहीमच उघडली आहे. आपल्या पराभवासाठी सत्तेचा वापर करत हक्काच्या कात्रज प्रभागाची मोडतोड करण्यामागे टिळेकरच आहेत, अशी मोरे यांची धारणा आहे. परंतू विकासकामांच्या जोरावर मोरे हे नवीन प्रभागातून निवडूणही आले आहेत. कात्रज परिसराचा कालबद्ध विकास आणि प्रकल्पातील कल्पकता, अभ्यास आणि व्यापक जनसंपर्क म्हणून हे सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. मागील अडीच वर्षात येवलेवाडीचा विकास आराखडा, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराला टिळेकरच दोषी आहेत, असा वसंत मोरे यांनी ठासून प्रचार केला आहे. किंबहुना कात्रज कोंढवा रस्त्याचे वाढीव दराने आलेेले टेंडर रद्द करून मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.

परंतू त्याचवेळी राज्यातील सत्तेचा वापर करत मतदारसंघात अनेक मोठे प्रकल्प आणण्यात टीळेकर यशस्वीही झाले आहेत. या मतदारसंघामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची ताकद वाढविण्यातही टिळेकर यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा वापर करून राज्यात युवा वर्गासाठी कार्यक्रम आणि शासकिय योजनांबाबत जनजागृतीमुळे ते शिर्षस्थ नेतृत्वाचे ताईत बनल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.

दरम्यान, नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार केला होता. किंबहुना मनसेने आघाडीला पाठींबाच दिला होता. हडपसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून भाजपच्या लाटेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक हडपसर मधून विजयी झाले आहेत. दहा वर्षांच्या पालिकेतील सत्ता काळात राष्ट्रवादीने या मतदारसंघातून पाच जणांना महापौरपद दिले आहे. हे महापौरपद देताना माळी आणि मराठा समाजाचा समतोल राखला होता. त्यामुळे बर्‍यापैकी सामाजिक गणित राखले होते. मागील निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत स्पर्धेतून टिळेकर यांना आतून मदतही केली होती. परंतू भाजपने पक्षाचे शिर्षस्थ नेतृत्व आणि आदरणीय शरद पवार यांचे नाव जाणीवपूर्वक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात ओवल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वजण गटतट आणि अंतर्गत वाद बाजूला ठेवून भाजपच्या पराभवासाठी सरावले आहेत.

अशा परिस्थितीत या मतदारसंघामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. विशेष असे की रष्ष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचे दोघांचे लक्ष भाजप राहाणार असून या दोन्ही पक्षांतील मतविभागणी कशी होते यावर टिळेकर यांच्या जयपराजयाचे गणित ठरणार आहे. झोपडपट्टयांची संख्या अधिक असलेल्या भागातून वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांचा फायदा टिळेकर यांना होणार आहे.

Visit : policenama.com