विधानसभा 2019 : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील Vs दत्‍तात्रेय भरणे थेट लढत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीला जोर चढत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघाचा देखील यात समावेश आहे. इंदापूर हा हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जातो. या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रेय भरणे यांच्यात 2014 मध्ये लढत झाली होती. यामध्ये दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा धक्कादयक पराभव केला होता. दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय वैर असून संधी मिळेल तिथे एकमेकांना शह-कटशह देण्याची संधी दोघेही सोडत नाहीत.

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. भाजप प्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे उमेदवार असतील अशी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे इंदापूर मतदारसंघामधील लढत स्पष्ट झाली आहे. दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा आहे. सलग चारवेळा इंदापूर मतदारसंघातून हर्षर्धन पाटील हे निवडून आले आहेत. 2014 निवडणूकीत त्यांना दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीत दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार हे अटळ आहे. या निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये पाणी प्रश्न हा प्रमुख मुद्दा असू शकतो. दोन्ही नेत्यांनी पाणी प्रश्नावरून अनेक वेळा एकमेकांवर तोंडसुख घेतले आहे.

2014 च्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली होती. या निवडणूकीत खरी लढत काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे यांच्यात झाली होती. तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
इंदापूर विधानसभा मतदार संघाचा 2014 चा निकाल
दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी) – 1,08,400
हर्षवर्धन पाटील (काँग्रेस) – 94, 227
ज्ञानदेव चवरे (भाजप) – 4260
विशाल बोन्द्रे (शिवसेना) – 2184