मुरबाड विधानसभेची जागा शेकाप लढणार : चंद्रकांत पष्टे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आघाडी आहे. मात्र मुरबाड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पक्षांतरामुळे दयनीय अवस्था झाल्याने ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मुरबाडची जागा शेकाप लढणार असून विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत पष्टे निवडणूक लढणार असल्याचे ठाणे जिल्हा चिटणीस नारायण क्षीरसागर यांनी आज मुरबाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात केवळ सिमेंट काँक्रेटचे रस्ते करण्याचे काम झाले आहे आहेत, मात्र इथल्या ग्रामीण भागाचा कोणताही विकास झालेला नाही. मुरबाड औद्योगिक क्षेत्रात जवळपास सत्तर टक्के कारखाने बंद आहेत. त्यामुळे इथल्या सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही. येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध नाही. आजही तालुक्यातील अनेक वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत आहे. यामुळे केवळ विकासाचा देखावा भाजपच्या सरकारने उभा केला आहे. शेतकरी कामगार पक्षाची मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाळेमुळे रुजली आहेत. अनेक जुने कार्यकर्ते आजही पक्षात कार्यरत असल्याने मुरबाड मतदारसंघात शेकाप निवडणूक जिंकेल, असा विश्वास विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत पष्टे यांनी व्यक्त केला.

यावेळी म्हसा विभाग अध्यक्ष तानाजी भालेराव, मुरबाड शहराध्यक्ष जीवन पष्टे, तालुका सहचिटणीस मुस्तकिम सय्यद, तालुका संघटक भरत थोरात इ. उपस्थित होते.