जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचाच कट्टर समर्थक देणार ‘टक्कर’, क्षीरसागर Vs शेख Vs क्षीरसागर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानतंर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. एमआयएमने आज पाचवी यादी घोषीत केली असून बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शेख शफिक मोहंमद यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्याच कट्टर समर्थकाचे आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना रोहयो आणि फलोत्पादन खात्याचे मंत्रीपद मिळले. विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास शिवसेनेच्या हक्काची असलेली बीडची जागा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाल्याने बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेची उमेदवारी निश्चीत झाली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फॉर्म दिला.

बीड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर आणि एमआयएम कडून शेख शफिक मोहंमद यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये असताना शेख मोहंमद हे त्यांचे कट्टर समर्थक होते. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्याच कट्टर समर्थकाचे आव्हान असणार आहे. या लढतीकडे संपूर्ण बीड शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

जयदत्त क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक असलेले शेख मोहंमद यांना एमआयएमकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुरुवातीला एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांनी जैनुद्दीन यांना उमेदवारी न देता शेख मोहंमद यांच्या नावाची घोषणा केली. इम्तियाज जलील यांनी शेख मोहंमद यांच्या नावाची घोषणा केल्याने बीडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Visit : policenama.com