‘रासप’ स्वत:च्या चिन्हावरच लढणार विधानसभा निवडणूक : महादेव जानकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत एनडीएचा घटकपक्ष असलेल्या रासपने आगामी विधानसभा निवडणुका स्वत:च्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रासप भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, ‘आम्ही एनडीएचे घटक पक्ष असलो तरी कमळाच्या चिन्हावर विधानसभा लढण्यास तयार नाही. इतर घटक पक्षांची भूमिका माहिती नाही, पण रासप स्वतःच्या चिन्हावर लढण्यावर ठाम असल्याचं रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत रासपला ज्या जागा मिळतील त्या रासपच्या चिन्हावर लढवणार आहोत. जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. जागा वाटपांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. रासपला मिळालेल्या जागांवर उमेदवार उभे करू तसेच ते रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महादेव जानकर यांच्या या निर्णयामुळे इतर घटक पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने आपल्या घटक पक्षांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी रणनिती आखण्यात येत आहे. जेणे करून भाजपच्या जागा वाढतील आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल. मात्र, महादेव जानकर यांनी स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.