उदयनराजेंचा पुन्हा ‘यु-टर्न’, भाजप प्रवेशाच्या पुन्हा हालचाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. दरम्यान काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यावरून यु-टर्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. याशिवाय उदयनराजेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत कोणत्या टप्प्यात भाग घेतला नाही. उदयनराजे यांची शिवस्वराज्येत यात्रेत स्टार प्रचारक म्हणून निवड झाली होती. पण या यात्रेत राजेंनी कोणत्याच टप्प्यात भाग घेतला नाही. ही यात्रा साताऱ्यात असतानाही राजेंनी त्याकडे पाठ फिरवली होती.

उदयनराजे यांनी भाजप प्रवेशासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अट घातली होती. मात्र, पंतप्रधानांचा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत प्रवेश होऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले होते. तसेच खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेसोबत पोट निवडणूक घेण्यात यावी अशी अट घातली होती. मात्र, पोट निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोग घेते अशी माहिती उदयनराजे यांना दिली होती.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रवेश रोखण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न
उदयनराजे भोसले भाजप प्रवेशाच्या तयारीत होते तेव्हा आघाडीतील अनेक नेते त्यांची समजूत काढताना दिसले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेतली होती. त्याआधीही राष्ट्रावादीचे नेते शशिकांत शिंदे यांनीही उदयनराजेंची भेट घेतली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उदयनराजेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.