मंत्र्यासोबत डिनर करण्यास नकार ! विद्या बालनच्या सिनेमाची शुटींग थांबवली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस विद्या बालन (Vidya Balan) हिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेरनी (Sherni) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची शुटींग सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. परंतु अचानक सिनेमाची शुटींग अर्ध्यावर थांबली आहे. विशेष बाब अशी की, मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह नाराज झाल्यामुळं ही शुटींग थांबवण्यात आल्याचं एका इंग्रजी वृ्त्तात नमूद करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वनमंत्री विजय शाह यांनी काही दिवसांपू्र्वी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र विद्यानं हे आमंत्रण स्विकालं नव्हतं. यानंतर अचानक सिनेमाची शुटींग थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विजय शाह नाराज झाल्यामुळं त्यांनी ही शुटींग बंद करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. परंतु विजय शाह यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शेरनी सिनेमाची टीम नुकतीच शुटींगसाठी जंगलात जात होती. बालाघाटमधील जिल्हा वनाधिकाऱ्यांनी प्रॉडक्शनच्या गाड्या वाटेत अडवून केवळ दोनच गाड्या जंगलात जाऊ शकतात असं सांगितलं.

वनमंत्र्यांनी फेटाळलं डिनरचं वृत्त

विजय शाह यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नाही तर सिनेमाच्या टीमकडूनच मला जेवणाचं आमंत्रण मिळालं होतं. परंतु मीच ते नाकारलं असंही त्यांनी सांगितलं आहे. वनमंत्री शाह म्हणाले, ज्यावेळी या लोकांनी मला शुटींगसाठी परवानगी मागितली तेव्हा मी बालाघाटमध्ये होतो. त्यावेळी त्यांनी मला लंच आणि डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं, जे मी नाकारलं होतं. मी महाराष्ट्रात गेल्यावर त्यांची भेट घेईन आता नाही. तसंच मी त्यांच्यासोबत जेवण करण्यास नकार दिला होता, शुटींगसाठी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

You might also like