विखे पाटील आणि मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील दोघांनीही आपली मुलं भाजपात पाठवली आणि स्वतः मात्र गेले नाहीत. कारण लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत दोघांच्या मनात शंका आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना भाजपामध्ये पाठवले मात्र, स्वतः भाजपात पक्ष प्रवेश केला नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना लगावला आहे. तसेच नवाब मलिक यांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.

विखे पाटील व मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना नवाब मलिक म्हणाले की, ‘राधाकृष्ण विखे पाटील व विजयसिंह मोहिते पाटील दोघेही भाजपाच्या वर्तुळात दिसतात, मात्र भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करत नाहीत. याचे कारण स्पष्ट आहे की विखे पाटील आणि मोहिते पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर भरोसा नाही. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना भाजपामध्ये पाठवले मात्र, स्वतः भाजपात पक्ष प्रवेश केला नाही. या दोन्ही नेत्यांना आपल्या जागा निवडून येतील का ? याबाबत विश्वास नाही. लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय होणार की नाही याबाबत दोघांच्या मनात शंका आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकलूज येथे सभा घेतली. या सभेत विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांनी भाजप प्रवेश केला नाही यावर मलिक यांनी टीका करत ही प्रतिक्रिया दिली आहे.