रेमडेसिवीरवरुन राजकारण पेटले, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. लसीकरण, रेमडेसिवीरबाबत पुरंदरशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. तसेच त्यांनी रेमडेसिवीर तुटवड्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय तालुक्यातील लसीकरण थांबले आहे. यामुळे विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवतारे यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आरोग्य सुविधांची माहिती घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझी भूमिका महाविकास आघाडीच्या विरोधात नाही. माझी नाराजी प्रशासनावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी आणि एफडीए यांच्या कारवाईवर संशय असल्याचे वक्तव्य शिवतारे यांनी केले आहे.

आमच्यावर अन्याय झाला

विजय शिवतारे म्हणाले, पुरंदर तालुक्यामध्ये 1800 रुग्ण असताना केवळ 228 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. लसीकरणाबाबतही आमच्यावर अन्याय झाला आहे. तालुक्यात केवळ 34 हजार लसीकरण झाले आहे. पुरंदर तालुक्यात कोरोनाचा धोका जास्त असताना पुरंदरशी भेदभाव होत आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र दुपटीने लसीकरण झाले आहे. प्रशासनाकडे 200 बेडसाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच ऑक्सिजनचा देखील तुटवडा दूर करावा अशी मागणी केली असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

आमदाराबाबत काही बोलायचं नाही

पुरंदरमध्ये असलेल्या इथेनॉल प्लानटमध्ये ऑक्सिजन प्लान्टची परवानगी देण्यात आली आहे. कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. तालुक्यात औषधांचे मोठ्या प्रमणात ब्लॅक मार्केटिंग होत आहे. प्रशासन चांगले काम करत आहे. मात्र आमच्याबाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला. मला राजकारणावर बोलायचे नाही. तसेच मला आमच्या आमदरांबाबत देखील काहीही बोलायचे नाही, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.