‘सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय ? नेत्यांची मुलं म्हणून त्यांना उमेदवारी देणार का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय असे वक्तव्य जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. शिवाय पार्थ आणि सुजय हे केवळ नेत्यांची मुलं आहेत म्हणून त्यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी देणार का ? असा सवालही विजय शिवतारे यांनी केला आहे. इतकेच नाही तर, शरद पवार यांना वाऱ्याची दिशा समजल्याने त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे अशी टीकाही त्यांनी केली. पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “पार्थ पवार आणि सुजय विखे या दोघांचे कर्तृत्व काय आहे ? केवळ नेत्यांची मुलं म्हणून त्यांना पक्षात घेत उमेदवारी देणार का ? दोघांनी किमान दहा वर्ष तरी समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतरच पक्षांनी त्यांच्या उमेदवारीचा विचार करायला हवा होता ” असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. याच मुद्द्यावर विजय शिवतारे यांनी भाष्य केलं आहे.

‘बारामती लोकसभा निवडणूक लढवणार का ?’
यावेळी पत्रकारांनी त्यांना बारामती लोकसभा निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न विचारला असता विजय शिवतारे म्हणाले की, “बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असल्याने यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जागेबाबत निर्णय घेतील. पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास पुढील निर्णय घेतला जाईल” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
‘मी पुरंदरचे प्रश्न मार्गी लावले’ 
पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या प्रश्नाबाबत बोलताना शिवतारे म्हणाले की, “आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. अजित पवार प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले. या जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही ? युतीचे सरकार आल्यावर मी पुरंदरचे प्रश्न मार्गी लावले असं त्यांनी सांगितलं.
‘शरद पवारांच्या कामाबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी’ 
शरद पवारांनी माढ्यातून घेतलेल्या माघारीबाबत बोलताना शिवतारे म्हणाले की, “शरद पवार यांना वार्‍याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली. शरद पवार यांचे कार्य खूप मोठे आहे. पण मागील निवडणुकीतील माढामधील कामाबाबत जनतेमध्ये शरद पवार यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे.”