भाजपाने ऑफर दिल्यास माढ्यातून लढणार : विजयसिंह मोहिते-पाटील

माढा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपने ऑफर दिल्यास माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. माजी आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी ते आले होते, त्यावेळी ते पत्रकरांशी बोलत होते.

राष्ट्रवादीत असताना तुम्ही भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला असता, रणजितदादा भाजपमध्ये गेलेच आहेत. त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर मी उभारण्यास तयार आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या या भूमिकेमुळे आता पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता लागली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यातच विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने माढ्यात धक्कातंत्र अवलंबिले जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, भाजप प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, रवींद्र ननवरे, गुरूराज कानडे आदी उपस्थित होते.