विजयसिंह मोहिते पाटलांच्या ‘या’ विधानानं वाढवलं भाजपचं ‘टेन्शन’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज पुण्यात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे एकाच व्यासपीठावर दिसले. दरम्यान त्यांच्यात चर्चा देखील झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मोहिते पाटील हे भाजपात गेले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांची शरद पवारांशी भेट झाली. मोहिते पाटील यांना व्यासपीठावर बघताच शरद पवारांनी त्यांना बसण्यास सांगितलं आणि त्यांच्यात जवळपास १५ मिनिट चर्चा देखील झाली.

या कार्यक्रमात विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की, ‘मी या आधीही पवार साहेबांना दोन तीन वेळा भेटलो आहे. माझा मुलगा भाजपात गेला आहे. पण मी अजून आहे तिथेच (राष्ट्रवादीतच) आहे.’ त्यांच्या या वक्तव्याने आता भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. असे असले तरी मोहिते पाटील यांच्यामुळेच माढ्याची जागा भाजपाने जिंकली आहे. कारण माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु मोहिते पाटील घराण्याने भाजपाला पाठिंबा दिल्याने ही प्रतिष्ठेची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना शब्द दिला होता की भाजप उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून एक लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य देऊ, त्यांनी तो शब्द खरा केला. मात्र राज्यात आता सत्ता बदलली असून सध्या सत्तेचे वारे शरद पवारांकडे वाहताना दिसत आहेत. अशात आज मोहिते पाटलांनी आपण राष्ट्र्वादीतच आहोत असे सांगून पुन्हा संभ्रम निर्माण केला. आगामी काळात राजकीय वर्तुळात काय बदल होतात हे पाहणे सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/