बिनधास्त जा भाजपमध्ये… आम्ही आहोत पाठीशी

मोहिते-पाटील पितापुत्रांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतल्याने या ठिकाणी कोण निवडणूक लढवणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातून मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे नाराज मोहिते-पाटील पितापुत्र भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्य़कर्त्यांनी मोहिते पाटील पितापुत्रांना भाजपमध्ये बिनधास्त जा आम्ही आपल्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली.

अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातच मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्त भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांसोबत दिसले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार यादीत मोहिते-पाटलांचं नाव नव्हतं. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे. रणजीतसिंह यांनी फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं.