काय सांगता ! होय, 73 वर्षीय भिकार्‍यानं मंदिराला दिले 8 लाख रूपये ‘दान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशामधील विजयवाडा येथील एका ७३ वर्षीय भिकाऱ्याने गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत एका मंदिराला तब्बल ८ लाख रुपये दान म्हणून दिले आहेत. तसेच या भिकाऱ्याचे म्हणणे आहे की मंदिराला दान दिले तेव्हापासून त्याच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. या भिकाऱ्याच्या दानशूरपणाची मंदिर प्रशासनाकडून प्रशंसा करण्यात येत आहे. दरम्यान या ८ लाखांच्या दानातून मंदिर प्रशासन एक गोशाला उभारणार असल्याचे समजले.

मिळालेल्या माहितीनुसार, या भिकाऱ्याचे नाव यादी रेड्डी असे आहे. भिकारी होण्याआधी या गृहस्थाने सुमारे ४० वर्ष रिक्षा ओढण्याचे काम केले आहे. परंतु त्याला गुडघ्याचा त्रास सतावू लागला, त्यामुळे त्याच्याकडे कुठलाच पर्याय न उरल्याने तो मंदिराबाहेर बसून भीक मागू लागला.

रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले की मी तब्बल ४० वर्षे रिक्षा ओढण्याचे काम केले. पहिल्यांदा मी एक लाख रुपये साईबाबा मंदिराच्या अधिकाऱ्यांना दान स्वरुपात दिले होते. त्यानंतर रिक्षाचे काम करत असतानाच माझी अचानक तब्येत बिघडू लागली. त्यामुळे मला पैशांची गरज भासू लागली. त्यामुळेच मी मंदिरात होईल तेवढे जास्त पैसे दान करण्याचे ठरवले आणि त्या पुण्याईमुळे माझी मिळकत वाढेल असे मला वाटत होते. असे त्याने स्पष्ट केले.

माझी सर्व कमाई करणार दान : रेड्डी
रेड्डी म्हणाले की, ‘मी मंदिराला दान केल्याने माझ्या उत्पन्नात वाढ झाली. विशेष म्हणजे लोक देखील ओळखू लागली तसेच मी आतापर्यंत मंदिराला ८ लाख रुपयांचे दान दिले आहे. मी माझी आयुष्यभराची सर्वच कमाई ही मंदिराला दान देणार आहे’. दरम्यान रेड्डी यांच्यामुळे मंदिराचा चांगला विकास होऊ लागला आहे असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की मंदिरासाठी आम्ही कुणाकडेही दान मागत नाही मात्र काही लोक स्वेच्छेने दान करीत असतात, असे साईबाबा मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अधिकाऱ्याने रेड्डी यांनी केलेल्या दानाची स्तुती केली असून त्यांच्या दानातून लवकरच एक गोशाला उभारणार असल्याचेही स्पष्ट केले.