जिवंत पकडला गेला विकास दुबे, चौकशीत पर्दाफाश होऊ शकतो अनेक ‘खादी’ आणि ‘खाकी’वाल्यांचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 8 पोलिसांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या गँगस्टर विकास दुबेला अखेर पकडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 2 जुलै रोजी रात्री आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराजवळ पकडण्यात आले. विकासला पकडण्यात आल्याने अनेक गोष्टींचा खूलासा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हापासून विकास दुबे याचे प्रकरण उघडकीस आले आहे, तेव्हापासून आतापर्यंत बऱ्याच लोकांची नावे समोर आली आहेत. ज्यांची भेट विकास दुबेने घेतली होती. यामध्ये चौबेपूर पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस असोत किंवा ज्या नेत्यांनी स्वत: विकास दुबेचे नाव घेतले होते. विकास दुबे कशा प्रकारे आपला व्यवसाय चालवत होता आणि आपले वर्चस्व कसा वाढवत होता हे समोर येणार आहे. आता त्याच्या चौकशीत अनेक रहस्ये समोर येऊ शकतात.

या प्रकरणावर दिल्लीचे माजी पोलीस उपायुक्त एल.एन. राव यांच्या म्हणण्यानुसार, दुबे याला जीवंत पकडले ही चांगली गोष्ट आहे. जर त्याची इमानदारीने चौकशी केली तर अनेक गोष्टी उघड होतील. कोणते पोलीस त्याला संरक्षण देत होते. कोण कोणते नेते मंडळी त्याच्या संपर्कात होते. राव यांनी सांगितले की, विकास दुबेला भिती होती की कदाचीत त्याचाही एन्काऊंटर होऊ शकतो. म्हणूनच तो यूपीहून हरियाणाला गेला आणि तेथून तो मध्य प्रदेशात आला. जेणे करुन जगाला असे वाटेल की तो आत्मसमर्पण करीत आहे.
अखिलेश यादव यांनी दिला इशारा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आता इशारा दिला आहे. ते म्हणाले, आता अनेक लोकांचा पर्दाफाश होऊ शकतो. अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे की, ‘कानपूर-कांड’ चा मुख्य दोषी पोलिसांच्या ताब्यात असल्याची बातमी येत आहे. जर हे सत्य असेल तर सरकारने स्पष्ट करावे की हे आत्मसमर्पण आहे किंवा अटक. तसेच त्याच्या मोबाइलची सीडीआर देखील सार्वजनिक करा जेणेकरून खऱ्या गोष्टींचा पर्दाफाश होऊ शकेल.

विकासच्या संपर्कात कोण कोण होते ?
यूपी पोलिसांनी चौबेपूर पोलीस स्टेशनचे निलंबित एसओ विनय तिवारी याला विकास दुबेला मदत केल्या प्रकरणी अटक केली आहे. तसेच बीट प्रभारी केके शर्माला देखील अटक करण्यात आली असून त्या दोघांवर खबरी असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याशिवाय विकास दुबे याचा एक जुना व्हिडीओ समोर आला असून यामध्ये त्याने भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांशी संपर्क साधण्याविषयी बोलला आहे. भाजप आमदारांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि विकास दुबे याच्याशी आपला कोणताही संपर्क नसल्याचे सांगितले. याशिवाय विकास दुबे फरार झाल्यानंतर पोलिसांनी जवळपास दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनवर पाळत ठेवली होती आणि आता सर्व तपशील तपासले जात आहे. जेणेकरून, जर कुणी त्याच्याशी संपर्क साधला असेल तर त्याला पकडता येईल. एवढेच नाही तर विकास जेव्हा फरीदाबादहून मध्य प्रदेशात पोहचला त्यावेळी त्याला कोणीतरी मदत केली असल्याचा आरोप केला जात आहे.