कसा ‘गारद’ झाला 5 लाखाचं बक्षिस असलेला विकास दुबे ? कानपुर पोलिसांनी सांगितली संपुर्ण स्टोरी

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. कानपूरच्या बिकरू गावात २ जुलै रोजी आठ पोलिसांच्या हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी पोलिस कारवाई आहे. विकास दुबेवर ५ लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेने त्याला उज्जैनहून कानपूरला आणताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चकमकी घडली आणि तो मारला गेला.

विकास दुबेच्या चकमकीसंदर्भात कानपूर पोलिसांनी दिलेल्या निवेदनात असे सांगितले गेले की, ‘५ लाख रुपये बक्षीस असलेल्या विकास दुबेला उज्जैनमधून अटक केल्यानंतर पोलिस आणि एसटीएफची टीम आज १० जुलै रोजी कानपूर येथे घेऊन येत होती. कानपूर नगर भौंतीजवळ पोलिसांची गाडी अपघातात पलटी झाली. विकास दुबे व पोलिस कर्मचारी जखमी झाले.’

कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या दरम्यान विकास दुबेने जखमी पोलिस कर्मचाऱ्याची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला घेराव घालून आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला आणि पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला. या दरम्यान विकास दुबे जखमी झाला.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विकास दुबेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे विकास दुबेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कानपूर पोलिसांकडून आता हे निवेदन जारी केले गेले आहे. या संदर्भात कोणताही पोलिस अधिकारी कॅमेर्‍यासमोर बोलणे टाळत आहे.

गुरुवारी त्याचा साथीदार प्रभात मिश्रा याच्या एन्काऊंटरप्रमाणेच विकास दुबेचा एन्काऊंटर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार पंक्चर झाल्यानंतर प्रभात मिश्राने पोलिसांचे हत्यार हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांनी आत्मसमर्पण करण्यास सांगितले तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर देताना प्रभात मारला गेला.