‘बरं झालं ठार मारलं, अंत्यविधिलाही जाणार नाही’, विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर वडिलांनी सांगितलं

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूर येथील 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा यूपी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काउंटर केला. विकास दुबेचं एन्काउंटर बनावट आहे की खरं ? यावरून एकीकडे देशात राजकारण सुरु झाल असताना दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. पोलिसांनी ज्या प्रकारे दुबेचा एन्काउंटर केला, त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींनी पोलिसांची कारवाई पूर्व नियोजित असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर त्याचे वडील रामकुमार दुबे यांनी मौन सोडलं आहे.

ते म्हणाले की, बरं झालं त्याला ठार मारलं, त्याच्या अंत्यविधीलाही जाणार नसल्याचं रामकुमार दुबे यांनी सांगितलं आहे. तर विकासची आई सरला देवी यांनी स्वत:ला घरात बंद करून घेतलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर सरला देवी यांची प्रकृती बिघडली असल्याचेही समोर आलं आहे. तत्पूर्वी सरला देवी यांनी पोलिसांना सांगितलं होतं की, विकास दुबेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता त्या कानपूरलाही जाण्यास तयार नाहीत. लखनऊमध्येच राहणे त्यांनी पसंत केलं आहे. सरकारला जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, अशी प्रतिक्रिया सरला देवी यांनी गुरुवारी विकास दुबेला अटक केल्यानंतर दिली होती.

कानपूर आउटनंतर आठवडाभरापासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला उज्जैनच्या महाकाल मंदिरात बाहेरून काल अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला परत येत होते. पावसामुळं रस्ता काहीसा निसरडा झाला होता. बर्रा येथे असताना पोलिसांची कार अचानक रस्त्यावर उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबेला गोळी लागली आणि तो ठार झाला.