‘गँगस्टर’ विकास दुबेचं मुंबई ‘कनेक्शन’, साथीदाराला अटक झाल्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कानपुर हत्याकांड प्रकरणातील कुख्यात गुंड विकास दुबे पोलिसांसह झालेल्या चकमकीत ठार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर सहकाऱ्यांचा तपास सुरु केला आहे. आता त्याच्या एका सहकाऱ्याला मुंबईमधून अटक केले आहे. या आरोपीचे नाव अरविंद उर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (वय-४६) आहे. तसेच त्याचा वाहनचालक सुशीलकुमार उर्फ सोनू सुरेश तिवारी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हे काम केले असून एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी दोन्ही आरोपींना ठाण्यात ताब्यात घेतले आहे.

कानपुरमधील बिकरु गावात विकास दुबेला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर दुबे व त्याच्या सहकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात ८ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर विकास दुबे फरार झाला. मात्र दुबेला अटक झाल्यानंतर त्याला उज्जैनहून कानपुर येथे घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. दरम्यान विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांसह झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

एटीएसने अशी केली कारवाई

एटीएसला कानपूर पोलिस हत्याकांड प्रकरणातील फरारी आरोपी गुड्डन त्रिवेदी हा ठाण्यात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी आपल्या पथकासह ठाण्यातील कोलशेत रोड येथे एका घरावर छापा टाकून आरोपी त्रिवेदी आणि त्याचा वाहनचालक सोनू तिवारीला ताब्यात घेतले. तसेच आरोपी गुड्डन त्रिवेदीवर सरकरने रोख बक्षीस जाहीर केले आहे.