विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला भीषण आग, 5 कामगार गंभीर जखमी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : अहमदनगर जिह्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता आग लागली. या भीषण आगीत पाच ते सहा कामगार गंभीररीत्या होरपळले असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, यातील दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, दोन ते आडीच तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात १२ अग्निशामक दलांना यश आले आहे.

गँमन इंडिया या खासजी कंपनीने विखे पाटील कारखान्यासोबत करारकरून प्रवरा रिन्योएबल एनर्जी लिमिटेड नावाचा सह उर्जा प्रकल्प उभारला आहे. याच प्रकल्पामध्ये शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ३०० फूट उंचीवर काही कामगार वेल्डींगचे काम करत होते, त्यावेळी वेल्डींगच्या ठिंणग्या खाली दगडी कोळसावर पडल्या, ज्यांनंतर त्याने पेट घेतला. तसेच बाजूलाच असलेल्या बॉयलर गॅसने पेट घेतल्याने आगीने भयंकर रूप धारण केले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, कामगाराना बाहेर पडणे मुश्किल झाले आणि या आगीमध्ये होरपळले. त्यात एकाने जीव वाचविण्यासाठी ३०० फुटावरून उडी टाकल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, संगमनेर शिर्डी राहाता राहुरी देवळाली प्रवरा, श्रीरामपूर कोपरगांव या ठिकाणाहून अग्निशामक दलांना पचरणा करण्यात आली, यावेळी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.