विखेंचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विखे यांचे शेकडो कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. डॉ. सुजय विखे-पाटील हे थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आघाडीची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नसल्याने विखे यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे भूमिका घेतली आहे. आज सकाळ पर्यंत राष्ट्रवादीकडून नगरची जागा सोडली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे विखे यांचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा झाले आहेत. काही वेळानंतर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजप विखेंना उमेदवारी देणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

खा. गांधींची अस्वस्थता वाढली
विद्यमान खासदार असूनही ऐनवेळी पत्ता कट होणार असल्याने खासदार दिलीप गांधी यांची अस्वस्थता वाढली आहे. ते अज्ञातवासात गेल्यासारखे झाले असून, ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांच्या समर्थकांनी काल मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावल्याचे सांगितले जात आहे.