राज्यात पीकविम्याचा ४ हजार कोटींचा घोटाळा : विखे पाटील

बुलडाणा : पोलीसनामा आॅनलाइन – पीकविम्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांकडून जमा करण्यात आले, मात्र शेतकऱ्यांना जमा झालेल्या रकमेच्या तुलनेत अर्धी रक्कमसुद्धा वाटप झाली नाही. २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत ४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर देशात पीकविमा कंपन्यांत ६० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे. ते बुलडाण्यातील चिखली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

विखे पाटील यांनी येथील दुष्काळी भागाची पाहणी केली. तसेच चिखली येथे अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा उतरविला होता. हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा झाले, परंतु शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाटप करताना तोकडी रक्कम देण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विमा कंपन्यांना या दोन वर्षांत ४ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. विमा कंपन्यांचा फायदा करवून देण्यासाठीच सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ४ हजार कोटींचा घोळ करून शेतकऱ्यांचे पैसे शासनाने विमा कंपन्यांच्या घशात घातले आहेत.

स्मशानभूमी जागेसाठी बौद्ध समाजाचे उपोषण
कोल्हापूर : इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज प्लान्टची जागा ही बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी राखीव आहे. त्यामुळे ही जागा पूर्ववत समाजास मिळावी या मागणीसाठी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या जागेबाबत जिल्हा न्यायालयात दावा सुरू आहे. ही जागा महार वतनाची अल्पभूधारकांची असून, त्यांच्या जमिनी घेता येत नाहीत. त्यामुळे ही जागा समाजास परत मिळावी, अशी समाजाची मागणी आहे. नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणचे आरक्षण उठवले असल्याचे सांगितले जात असले तरी ते पूर्णपणे चुकीचे आहे.

बौद्धविहारात वारंवार धम्म परिषदा होत असतात. अशा ठिकाणी आरोग्यास घातक असलले मलनिस्सारण केंद्र उभारल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तो सोडवावा; अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी दीपक भोसले, विजय कांबळे, अमोल कुरणे, दयानंद माळगे, प्रकाश कांबळे, गणपतराव कांबळे, अविनाश कांबळ, प्रकाश कांबळे, राहुल कांबळे, पुंडलिक कांबळे, किरण कांबळे, एम. के. कांबळे, अमर कांबळे, दिलीप कुरणे, के. के. कांबळे, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.