विखे पिता-पुत्र बाळासाहेब थोरातांना विधानसभेच्या चक्रव्यूहात अडकवणार ? ; अहमदनगरात चर्चेला उधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर मध्ये विखे पाटील आणि थोरात यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात केलेला प्रचार आता त्यांना विधासभेसाठी जड जाणार असल्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणूक आगामी ५ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी थोरात यांना विखे पाटील कुटुंबातील सदस्याचा सामना करावा लागणार असे दिसते आहे. यंदाच्या विधासभा निवडणुकांसाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील तसेच सुजय यांच्या आई आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

विधानसभेसाठी विखे पाटीलांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे अशी चर्चा आहे. विखेंची यंत्रण कामाला लागली असून संगमनेरात घर पाहण्यापासून कार्यकर्त्यांची जुळवाजुळवही सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

सुजय विखे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयानंतर संगमनेर विधानसभा निवडणुकीत विखे कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. संगमनेर मध्ये थोरातांचे वर्चस्व असले तरी विखे यांना मानणारा मोठा वर्ग संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आहे. विखेंच्या विजयाने संगमनेरातील त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार याची देखील चर्चा आहे.

धनश्री ,शालिनीताई यांच्या नावांची चर्चा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे किंवा खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे या दोघींच्या नावाची चर्चा संगमनेरात सुरू झाली आहे. विखे परिवाराने संगमनेर विधानसभेची निवडणुक लढविल्यास थोरातांपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. विखेंची यंत्रणा विधानसभेसाठी कामालाही लागली आहे. निवडणूक लढवायची असल्यास संगमनेरात घर असावे, यासाठी घराची पाहणीही सुरू झाल्याची चर्चा होत आहे.