आपण सगळे दहशतवादी आहोत : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपण सगळेच दहशतवादी झालो आहोत अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली. एका पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या समाजाच्या सर्व क्षेत्रांत जाती-धर्माचे विष कालवले गेले आहे. जाती, धर्माच्या नावाने घाण पसरली आहे. आम्हाला चित्रपट दाखवा, तो मान्य असेल तरच प्रदर्शित होईल असा गाढवपणा देशात सुरु आहे. सरकारी सेन्सॉरशिप असताना या खासगी सेन्सॉरशिपची आवश्यकता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात 18 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. यात अभिनेते विक्रम गोखले यांना पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त वार्तालापात ते बोलत होते. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही या वर्षाच्या महोत्सवाची थीम आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला आणि चित्रपट प्रेमींमध्ये आतुरता असलेल्या महोत्सवात यावर्षी 60 देशातील तब्बल 1900 चित्रपट आले होते. त्यातील 191 चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवादरम्यान रसिकांना मिळणार आहे. याशिवाय चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शन यांचाही समावेश दरवर्षी प्रमाणे असणार आहे

1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली, याला 60 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि अग्रेसर आहेच. याच राज्यात चित्रपटसृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांच्यासारख्या प्रणेत्याचा देखील जन्म झाला. याच राज्यात चित्रपट सृष्टीचा विस्तार देखील झाला. म्हणूनच सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन आम्ही यावर्षीच्या महोत्सवात घडवण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/