विक्रमच्या ‘स्माईल प्लिज’ चित्रपटाचा मुहूर्त हृतिक रोशनच्या हस्ते 

मुंबई : वृत्तसंस्था – फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याची सुरुवात बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते झाली. यावेळी अमिषा पटेल, झरीन खान, रोनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन-नंदा अशा बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि ‘स्माईल प्लीज’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

मनुष्य आयुष्यभर आनंदाच्या शोधात असतो पण आनंदाचा अर्थ हा प्रत्त्येकासाठी वेगवेगळा असतो अशी सिनेमाची वन लाईन असलेला हा चित्रपट विक्रम फडणीसच्या अगदी जवळचा आहे. आपल्या आईची गोष्ट एका गोष्टीत गुंफून सांगण्याचा प्रयत्न विक्रमने या चित्रपटात केला आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना विक्रमने सांगितले, हा चित्रपट माझ्यासाठी खूप विशेष आहे. या कथेत मला कुठेतरी माझ्या आईचा भास होतो आणि म्हणूनच तो माझ्या मनाच्या खूप जवळचा. मला आशा आहे की, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनातील ‘स्माईल प्लीज’ची फ्रेम नक्कीच बहरेल.

हृतिकने विक्रमच्या ‘हृदयांतर’ या सिनेमात एक गेस्ट अपिअरन्स दिला होता. यावेळी विक्रम बद्दल आपले मतं व्यक्त करताना हृतिक म्हणाला, विक्रमचे काम मला माहित आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची सवय आहे, कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात स्पष्ट असल्यामुळेच तो, ती उत्तमरित्या साकारू शकतो. विक्रम हा त्याच्या सिनेमाबद्दल प्रचंड पॅशनेट असतो.

या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर आणि मराठी सिनेमात पहिल्यांदा काम करणारी अदिती गोवित्रीकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. आजपासून या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होणार असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.