यामुळे विलास लांडे समर्थकांमध्ये अस्वस्थता

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिरूर मतदारसंघाच्या राजकारणाचा नूरच बदलला आहे. पक्षाने माजी आमदार विलास लांडे यांना लोकसभा लढण्याची तयारी सुरु करायला सांगितली. अमोल कोल्हेचा प्रवेशाबरोबर त्यांच्या शिरूर लोकसभेच्या उमेदवारी बद्दल राष्ट्रवादीने चर्चा सुरु केली. म्हणून लांडेंच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्यें टोकाची नाराजी असल्याचे चित्र सध्या राष्ट्रवादीच्या गोटात आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशा बरोबरच त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी बाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. तशा आशयाचे संदेश देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते व्हायरल करत आहेत. या सर्व राजकीय बदललामुळे लांडे समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शिरूर मधून कोणीच राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी तयार नव्हते तेव्हा विलास लांडे यांना पक्षाने उमेदवारीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले. विलास लांडे यांनी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात देखील केली. मात्र कोल्हे यांनी शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली आणि सर्व राजकारणच बदलले. एवढे दिवस निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींना डावलून नव्याने पक्षात दाखल झालेल्या व्यक्तीला पक्ष उमेदवारी देणार का असा उघड सवाल लांडे समर्थक करू लागले आहेत. अमोल कोल्हे यांनी पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असे म्हणले आहे. तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून आपण पुढील भूमिका स्पष्ट करू असे विलास लांडे यांनी म्हणाले आहे. विलास लांडे यांच्या पेक्षा अमोल कोल्हे हे ग्लॅमरस उमेदवार ठरणार असल्याने राष्ट्रवादीचा त्यांच्याकडे अधिक ओढा आहे. तसेच अमोल कोल्हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करतील अशी शक्यता देखील राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान अशा दूषित राजकीय वातावरणातच आज मंगळवारी भोसरीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांची उपस्थिती हे या मेळवाच्या आकर्षण असणार आहे. आधीच उमेदवारी वरून लांडेंच्या कार्यकर्त्यांत धुसफूस असताना लांडेंचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भोसरीत कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. अमोल कोल्हे यांना प्रमुख आकर्षण म्हणून आमंत्रित करणे हे म्हणजे विलास लांडेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असणार आहे. त्यामुळे आज भोसरीच्या मेळाव्यात अजित पवार उमेदवारी बाबत काय संकेत देतात हे देखील पाहण्यासारखे आहे.