कौतुकास्पद ! सावली ग्रामस्थांनी केलं सोशल मीडियावर आवाहन, 40 हजार जमा करून शासनाला केली 4 बेडची मदत

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन – कोराना महामारी रोगाच्या साथीमध्ये शहरी भागांबरोबरच सध्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा वेळेत व अधिक मिळाव्यात या सेवा उपलब्ध होताना यामध्ये आपल्या सावली गावांचेही दायित्व असावे अशा उदात्त भावनेने सरपंच सौ.नंदा विश्वासराव जुनघरे यांनी आपल्या गावच्या ग्रामस्थांना सोशल मिडीयावरून मदतीचे आवाहन केले.

पाहता पाहता हजारो रूपये जमा होवून त्यातून केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ४० हजार किंमतीचे चार बेड सावली ग्रामस्थांकडून तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतिश बुद्धे व वैद्यकिय अधिकारी डॉ. साधना कवारे यांच्याकडे प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांनीच सरपंच सौ.नंदा जुनघरे यांचे कार्याचे कौतुक केले. कोरोना महामारीमुळे जिल्हयातील कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता सर्वच हॉस्पीटलमध्ये जाणवत आहे.

जावळी कोविड इर्मजन्सीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयश्री शेलार मॅडम यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून सावली गावच्या सरपंच सौ. नंदा विश्वासराव जुनघरे सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्रामस्थ व नेहरू युवा मंडळातील सदस्यांना कोवीड सेंटरला मदतनिधी उभारण्याचे आवाहन केले. या आवाहनास सर्वानीच उत्स्फुत प्रतिसाद मिळाला. यातून सर्वांनीच सामाजिक बांधीलकी जपून सर्वच गावांपुढे सावलीचा आरोग्य पॅटर्न ठेवला.

यावेळी जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी कोविड काळातील नेमकी गरज ओळखून ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल प्रशासनाच्या वतीने धन्यवाद दिले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. साधना कवारे यांनी सावली गावच्या दातृत्वाचे कौतुक केले. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानांतर्गत करावयाची कार्यवाही व घ्यायची काळजी या विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी गावातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चार ऑक्सिमीटर व एक ब्लड प्रेशर तपासणी मशीन आशा सेविकांकडे देण्यात आले. तसेच १४ व्या वित्त आयोगातून गावातील प्रत्येक कुटुंबास ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा कुंडीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल मान्यवरांनी ग्रामपंचायतचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी आरोग्य सेवक विशाल रेळेकर, सतिश मर्ढेकर, सरपंच नंदाताई जुनघरे, उपसरपंच दुर्योधन जुनघरे, पोलीस पाटील संजय कांबळे, ग्रामसेविका कुंभार मॅडम, आशा सेविका शैला म्हस्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, नेहरू युवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शामराव जुनघरे यांनी सुत्रसंचालन केले. विश्वासराव जुनघरे यांनी प्रास्ताविक केले. व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सपकाळ यांनी आभार मानले .