पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यास मुळशी तालुक्यातील गावांचा विरोध

पिरंगुट : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमध्ये खेड तालुक्यातील गावांचा समावेश करण्यावरून गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असतानाच आता मुळशी तालुक्यातील सहा गावांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात समावेश करण्यास विरोध केला आहे. याबाबत भुगाव आणि पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

मुळशी तालुक्यातील पूर्व भागातील भुगाव, भुकुम, पिरंगुट, लवळे, चांदे आणि नांदे ही गावे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कक्षेतून काढून पिंपरी-चिंचवड कार्यालयात समाविष्ट केली जाणार आहेत. यासाठी बावधन येथील पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर केले जाणार आहे. यासंदर्भात प्रस्तावदेखील दाखल झाला आहे. यामुळे मुळशी तालुक्यात तिसरे पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे. भुगावच्या सरपंच निकिता सणस आणि पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र देऊन भुगाव व पिरंगुट गावांचा आयुक्तालयात समाविष्ट होण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे या पत्राद्वारे सांगितले आहे.

मुळशी तालुक्यातील गावांच्या दृष्टीने पाषाण येथे असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय सोयीचे आहे.अचानकपणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या कार्यालयाशी तात्काळ संपर्क करून वेळीच उपाययोजना करता येईल. मात्र, हे कार्यालय जर पिंपरी-चिंचवड येथे केले तर ये- जा करण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी उद्भवलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गावे ग्रामीण पोलिसांच्या कक्षेतच राहिली पाहिजेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

भुगावच्या सरपंच निकिता सणस म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात जाण्यास आमचा विरोध आहे. अनेक गाव-वाड्या वस्त्यांचा कारभार हा पौड पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आजतागायत व्यवस्थित चालू आहे. वास्तविक पौड पोलीस स्टेशन हे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कक्षेत असले पाहिजे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांना याबाबत निवेदन देणार असे त्यांनी सांगितले.