उज्ज्वला योजनेतून निर्माण होणार लाकूड न पेटविणारी गावे : पालकमंत्री गिरीष बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
स्वयंपाक घरातील चुलीमध्ये लाकडाचा जळण म्हणून होणारा वापर हा महिलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे महिलांमध्ये नाक, डोळे, फुफ्फुस आणि ह्रदयाचे आजार दिसतात. महिलांच्या आयुष्यातील हाच धुराचा त्रास कमी करण्यासोबत महिलांना सक्षम करण्याकरीता उज्ज्वला योजना देशभरात राबविण्यात आली. आजपर्यंत संपूर्ण देशभरात तीन कोटी घरांमध्ये उज्ज्वला योजनेद्वारे गॅस जोडणी दिली असून आणखी पाच कोटी घरांमध्ये जोडणी देण्याचे उद्दिष्ट्य आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घरांमध्ये लाकूड न पेटविणारी गावे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

सिंहगड रस्त्यावरील भारतगॅसची श्रीराम गॅस एजन्सी आणि पानशेत रस्त्यावरील आंबी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजनेंतर्गत आंबी या गावातील १०० घरांमध्ये ही गॅस जोडणी बापट यांच्या हस्ते देण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, सरपंच पुष्पा निवंगुणे, राजेंद्र निवंगुणे, बाळासाहेब पासलकर, तानाजी मोरे, श्रीराम गॅस एजन्सीचे मयुरेश जोशी, उदय जोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गिरीष बापट म्हणाले, उज्ज्वला योजनेसारख्या केंद्र सरकारच्या १२० योजना आहेत. तर, राज्य सरकारच्या १०० आणि जिल्ह्याच्या पंचवीस आसपास योजना आहेत. सरकारच्या या योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थाने घ्यायला हवा. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी एक व्यक्ती करु शकत नाही. त्याकरीता लोकसहभाग आवश्यक असून त्यातूनच योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहचू शकेल.