‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ! ‘शिवसंग्राम’च्या विनायक मेटेंचा महाविकास आघाडीला ‘टोला’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा आज शपथविधी सोहळा पार पडला. आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावर घटकपक्ष नाराज आहे. यावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी तोंडसुख घेतले.

तीन पक्षांची तीन तोंडे आहेत. त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे मित्र पक्ष आहेत. सगळ्या घटक पक्षांनी यांना पाठिंबा दिला तेव्हा आश्वासनं दिली होती. ती पाळली नाहीत, आश्वासनांचा भंग केला. गरज सरो आणि वैद्य मरो असे वर्तन त्यांच्याशी केले. त्यामुळे याचा परिणाम पुढील कालावधीत निश्चित पहायला मिळेल, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारने मंत्रिमडळ विस्तारात घटक पक्षांना स्थान दिले का ? यावर बोलताना आमदार विनायक मेटे यांनी हे उत्तर दिले. महाविकास आघाडीच्या सरकारची वाट सोपी वाटते तेवढी सोपी नाही, असे भाकीतही मेटेंनी वर्तवले.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी ट्विट करून महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, ज्यांनी ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/