सहाव्याच काय पण सातव्या मजल्यावर देखील बसू शकतात आदित्य ठाकरे : सहस्रबुद्धे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे की, महाराष्ट्रात पुन्हा सेना भाजपच्या युतीचे सरकार येणार आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, येणाऱ्या काळात मोठ्या बहुमताने युतीचं सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापना करणार आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत बोलताना सहस्रबुद्धे म्हणाले की, आपल्या नेत्याने सर्वोच्च पदावर जावे असे कोणाला वाटणार नाही त्यामुळे राऊत यांनी बाळगलेली महत्वकांक्षा सहाजिक आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच संजय राऊत यांनी एक विधान केले होते की, चांद्रयानाला काही अडथळ्यांमुळे भलेही चंद्रावर लॅन्ड करता आले नाही. मात्र आमचे सूर्ययान (आदित्य ठाकरे) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नक्कीच लॅन्ड करेल. असे म्हणण्यामागचा राऊत यांचा हेतू हा होता की, आदित्य ठाकरे आता मुख्यमंत्री होणार आहेत. कारण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्रींचे कार्यालय आहे.

त्यावर सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, सहाव्या मजल्यावरच काय तुम्ही सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या अशा हव्या त्या मजल्यावर जाऊ शकता आणि एक गोष्ट अजून आहे ती म्हणजे सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त बाकीच्या अनेक मंत्र्यांचे कार्यालय देखील आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजे असा टोला सहस्रबुद्धे यांनी यावेळी लगावला.

2014 नंतर हे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रामध्ये भाजप हाच मोठा पक्ष आहे आणि लवकरच पुन्हा देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा युतीचे सरकार स्थापन होईल. असे मत सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केले.

Visit : policenama.com