काँग्रेसवर 100 कोटींचा ‘मानहानी’चा ‘खटला’ भरणार, वीर सावरकरांचे ‘पडनातू’ रणजीत यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी काँग्रेसविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला जाहीर केला आहे. ते म्हणाले की, निराधार आरोप करून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

अलीकडेच महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये वीर सावरकरांबद्दल अपमानास्पद टिप्पणी झाली. यावर रणजित सावरकरांनी म्हटले की, काँग्रेस वारंवार राजकीय फायद्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या वारसदारांवर हल्ला करीत आहे, पण काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीला येईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. तसेच वीर सावरकरांवर झालेल्या काँग्रेसच्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाआघाडीतील उद्धव ठाकरे सरकारला लाज वाटली आहे. काँग्रेसच्या नेत्यांवर मानहानी, गुन्हेगारी कट रचने आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले होते. सोबतच महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’वर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ या वादग्रस्त विधानावर माफी न मागण्याचे बोलत वीर सावरकरांचा उल्लेख केला होता. राहुल गांधी म्हणाले होते, ‘मी राहुल सावरकर नाही, माझे नाव राहुल गांधी आहे. मी दिलगिरी व्यक्त करणार नाही’. ज्यानंतर रणजित सावरकर यांनी राहुल गांधींनी माफी मागण्याची मागणी केली होती. यासाठी भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवरही हल्लाबोल केला. त्यावेळीही रणजित सावरकर यांनी राहुल गांधींविरूद्ध मानहानीचा खटला भरला होता.

सावरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पक्ष, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याशिवाय वीर सावरकरांबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते, ‘वीर सावरकर एक महान माणूस होते आणि कायमच राहतील. यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले होते की जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी वीर सावरकरांविरूद्ध अशा प्रकारची टीका कधीही सहन केली नसती.

You might also like