शिवजयंतीवरून वाद उफळला ! विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद उफळून आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले आहे. तिथी आणि तारखेवरुन वाद सुरु असताना विनायक मेटे यांनी शिवस्मारक प्रकल्प अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी देखील एकच शिवजयंती पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचे सांगत शिवसेनेला डिवचले. नितेश राणे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे, मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या सोबत आहोत. हीच ती वेळ, जय शिवराय.

उदयनराजेंनी उपस्थित केला सवाल –
काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज्यांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजेंनी देखील दोन शिवजयंतीवरुन सेनेला सवाल केला होता. शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. त्यांच्याच जयंतीवरुन होणार वाद दुर्दैवी आहे. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.