CM उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध, विनायक मेटेंनी दिला ‘हा’ इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे. सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहेत. त्यांच्या नकर्तेपणामुळेच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असलेले आरक्षण जातेय की काय अशी भिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून उद्या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काळे कपडे घालून, मशाली पेटवून विरोध करणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सांगितले आहे.

आमदार मेटे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे असून त्यांनी आजवर कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे चव्हाण यांना या पदावरून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. आज (शनिवार) पुण्यात आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी जर मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाविषयीचा उद्याचा आवाज ऐकला नाही तर 17 ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल आणि जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरु राहणार असल्याच त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशोक चव्हाण यांच्या कडील जबाबदारी काढून ती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात यावी यासाठी राज्यातील 13 मराठा संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असल्याची माहिती मेटे यांनी यावेळी दिली.

मराठा आरक्षण कोर्टात टिकवले पाहिजे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी केस टिकवली त्यांना केस लढवू दिली जात नाही. उद्या नाही ऐकले तर 17 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मशाली पेटवून, जागरण गोंधळ घालून आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.