मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर विनायक मेटेंचा सरकारवर गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण स्थगितीच्या दिलेल्या आदेशावर विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनावणीमध्ये जे वादविवाद झाले त्यानंतर कोर्टाने जे सांगितले त्यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे सरकारचा नकर्तेपणा समोर आला आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी सर्व तयारी झाल्याचे सांगितले होतं. पण आज मुंबईहून साधी कागदपत्र वकिलांपर्यंत पोहचवता आली नाहीत, असं विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

विनायक मेटे पुढे म्हणाले, हे सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाही. सरकारला फक्त स्वत:ची खुर्ची वाचवायची आहे. अप्रत्यक्षपणे कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. याला सरकार जबाबदार असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबत 25 ऑगस्टला सुनावणी होणार ही एकमेव समाधानाची बाब असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

सरकारवर आरोप करताना मेटे म्हणाले, बाकी सर्व ठिकाणी या सरकारला मराठा आरक्षण वाचवण्यात अपयश आलं आहे. सरकारला ताळमेळ घालता आलेला नाही. फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखविण्याच नाटक सरकार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मराठा समाजाला मातीत घालण्याचे, त्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम हे सरकार करत असल्याचा घणाघाती आरोप विनायक मेटे यांनी केला.