विनीता साहू गोंदियाच्या पोलीस अधिक्षक

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक विनीता साहू गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधिक्षक असणार आहेत. तर गोंदीयाचे पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांची बदली एसआरपीएफ बल गट क्र. ६ च्या समादेशकपदी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यात त्यांचा समावेश आहे.

विनीता साहू या २०१० च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी सिंधूदूर्ग, नांदेड, वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर त्यांची वाशिम येथून भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भंडारा पोलीस अधिक्षक असताना त्यांनी ग्रामीण व दूर्गम भागातील नागरिकांचे पोलीसांप्रती असलेले भय दूर करण्यासाठी मोबाईल पोलीस ठाणी कार्यान्वीत केली होती. शाळा महाविद्यालये याठिकाणी ही पोलीस ठाणी सुरु केली जात होती. दीड लाख लोकांना या सेवेचा लाभ मिळाली होती.

विनीता साहू यांच्या या प्रयत्नांमुळे लोकांच्या मनातील पोलिसांप्रती असलेली भीती कमी होऊन त्यांना मदत मिळाली. त्यामुळे लोकांच्या समस्या आणि तक्रारी या मोबाईल पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली गोंदीया जिल्हा पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे. गोंदीयाचे पोलीस अधिक्षक हरीष बैजल यांची बदली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे.