पुरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने केलेली मदत म्हणजे भीक नव्हे, तावडेंचे संभाजी राजेंना ‘सडेतोड’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक आदींनी त्यांच्या परीने दिलेली मदत म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या शब्दात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खासदार संभाजी राजे यांना उत्तर दिले.

कोल्हापूर सांगलीमधील पुरग्रस्तांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर उतरुन फेरी काढून मदत मागितली होती. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यावर खासदार संभाजी राजे यांनी ‘कोल्हापूरकरांना भीकेची गरज नाही. आम्ही स्वाभीमानी आहोत. ही पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा आहे’ या शब्दात ट्विटरवरुन त्यांच्यावर टिका केली होती. ही टिका विनोद तावडे यांना चांगलीच जिव्हारी लागली. त्यावर त्यांनी पत्राद्वारे संभाजी राजे यांना उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, “आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पुरग्रस्तांना मदत करण्याची प्रत्येक सर्वसामान्य माणसाची इच्छा होती. त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे का ? म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांची चेष्टा होत आहे, असे वाटते. ही भीक नव्हे तर सामान्य जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत आहे.

याचं संभाजी राजेंनी खरेतर कौतुक करायला हवं होतं”. पण त्यांनी त्याची अवहेलना केली, याची मला खंत वाटते. असंही तावडे यांनी म्हटलं आहे. बोरिवलीतील रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या गरीब जनतेकडून जमा झालेले पैसे सर्व मिळून ३.५० लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून मिळालेले २४.५० लाख रुपये, अशी एकूण २८ लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –