Pune : महापालिका नियमांचे उल्लंघन: पुण्यातील Bajaj Finance कंपनीला 86 हजारांचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाने सोमवारी (दि. 19) वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीवर कारवाई करत तब्बल 86 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील करण्याची ताकीद दिली आहे.

वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी अचानक पाहणी केली. यावेळी कंपनीत 86 कर्मचारी काम करत होते. तसेच त्यांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याचे दिसून आले. यानुसार कंपनीला प्रति व्यक्ती 1 हजार याप्रमाणे एकूण 86 हजारांचा दंड केला आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिकाने आखून दिलेल्या नियमांनुसार आस्थापना चालू ठेवाव्यात अन्यथा आणखी कारवाई कठोर केली जाईल अशी माहिती आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे.