2 क्विंटल जिलेबी अन् 1050 सामोसे पोलिसांनी केले जप्त, 10 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. उत्तर प्रदेशातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. असे असताना येथे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीत एका उमेदवाराने मतदारांना वाटप करण्यासाठी तयार केलेली तब्बल 2 क्विंटल जिलेबी आणि 1050 सामोसे पोलिसांनी जप्त केले आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे ही घटना घडली आहे. कोरोना नियम आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 10 जणांना अटक केली आहे.

हसनगंज ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारांने मतदारांना वाटप करण्यासाठी जिलेबी आणि सामोसे यांचा बेत आखला होता. तशी तयारीही केली होती. जिलेबी आणि सामोसे तयार करण्याच काम सुरू असतानाच उन्नाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी तयार केलेली 2 क्विंटल जिलेबी आणि 1050 सामोसे जप्त केले. त्यानंतर कोरोना नियमावलीचा आणि निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.