हद्दपार आदेशाचा भंग, सांगलीत दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – हद्दपार आदेशाचा भंग करून सांगलीत आलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली. बंड्या उर्फ बंडोपंत दडगे, अमोल पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी बंड्या दडगे, अमोल पाटील यांना हद्दपार केले आहे. हद्दपार आदेशाचा भंग केलेल्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांची पथके शहरात गस्त घालत होते. हद्दपारीची मुदत संपली नसतानाही दोघे सांगलीत फिरत असल्याची माहिती निरीक्षक पिंगळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पथकाने त्यांना अटक केली. दोघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अंतम खाडे, अमित परीट, जितू जाधव, निलेश कदम, सचिन कनप आदींच्या पथकाने ही कारवाई केली.