गोव्यातही शेतकरी विरुद्ध सरकार संघर्ष; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन  –   गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. देशात या आंदोलनाची धग पोहोचू लागली आहे. हे सुरु असतानाच आता गोव्यात आयआयटीचा कॅम्पस उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीवरून शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरु झालाय.
गोव्यातील सत्तारी तालुक्यामध्ये प्रस्तावित भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच आयआयटीचा कॅम्पस उभारण्यासाठी जमीन देण्याला गावकऱ्यांना विरोध केला आहे. जमीन देणार नाही अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं असून या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण मिळालं. गोवा पोलिसांनी राजधानी पणजीपासून ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना बळाचा वापर करुन हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकानावर लाठीचार्जही केला. तसेच यावेळी अश्रुधुरांचा वापरही करण्यात आला आहे.

संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

गोवा सरकारने मंगळवारी उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्यातील शेल-मेलॉलीम गावामध्ये प्रस्तावित आयआयटीच्या प्रकल्पाची पाहणी केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये जमीनीचे मोजमाप घेण्यात आलं. स्थानिक गावकऱ्यांचा या आयआयटी प्रकल्पाला विरोध असून या प्रकल्पामुळे आमची हक्काची जमीन जाईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जमीनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या राज्य सरकारच्या भूमि सर्वेक्षण अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा आयआयटीला स्थानिकांचा विरोध असला तरी प्रकल्पाचं काम सुरु केलं जाणार आहे, अशी माहिती रविवारी दिली होती. शेल-मेलॉलीम गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने गावकरी सहभागी झाले यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.