काळे झेंडे दाखवणाऱ्यांना कन्हैया कुमारच्या समर्थकांडून बेदम चोप

पाटना : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी लढतीमधील प्रमुख लढत म्हणजे बिहारमधील बेगूसराय येथील लढत. या ठिकाणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना कन्हैया कुमारने आव्हान दिले आहे. कन्हैया कुमारच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे. मात्र बेसुसरायमधील प्रचाराला गालबोट लागले.

कन्हैया कुमारचे कार्यकर्ते प्रचार करत असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे हाणामारीत रुपांतर झाले. कन्हैयाच्या कार्य़कर्त्यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पळवून पळवून मारले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.गडापुरा परिसरातील सुजानपूर येथील कोरैया गावात सीपीआय उमेदवार कन्हैया कुमारची प्रचार रॅली पोहचली. त्यावेळी गावातील काही तरुणांनी रॅलीला काळे झेंडे दाखवले. याचे रुपांतर वादात झाले. यांनंतर कन्हैया कुमारच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या तरुणांना मारहाण केली. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर काही तरुणांना त्यांच्या घरात घुसून मारले.

कन्हैया कुमारने केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना आव्हान दिल्याने लढतीत रंगत आली आहे. बेगुसरायमध्ये सीपीआयची ताकद आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून २३ मेला निकाल लागणार आहे.