ईद दिवशी देखील काश्मीरमध्ये हिंसाचार

श्रीनगर :वृत्तसंस्था

आज ईदच्या दिवशी देखील काश्मीरमध्ये हिंसाचार उसळल्याची बातमी आहे. काश्मीर मधील अनंतनागमध्ये हिंसक जमावाने सुरक्षा दलाच्या गाडीवर जोरदार दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. यावेळी जमाव इतका आक्रमक होता की सुरक्षा दलाचा जवानांना हवेत गोळीबार देखील करावा लागला. याबरोबरच काश्मीर मधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले यात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईदचा नमाज अदा केल्यानंतर अचानक काही लोकांनी अचानक येऊन सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या जमावाच्या हातात पाकिस्तान आणि इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचे झेंडे होते. यावेळी जमावाकडून पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देखील दिल्या जात होत्या . या आक्रामक जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीही दगडफेक सुरूच राहिल्याने सुरक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळे अनंतनागमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

तर, दुसरीकडे पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केले . पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग हा जवाना शहीद झाला. तसेच, अर्निया सेक्टरमध्येही पहाटे ४ वाजता पाकिस्तानने गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले .