विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कोलकत्त्यात हिंंसाचार !

कोलकत्ता : वृत्त संस्था- निवडणुक आयोगाने शुक्रवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर रात्री उशिरा कोलकत्ता येथे हिंसाचाराची घटना घडली. भाजपच्या गोडावूनमध्ये शिरुन टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी तेथील परिवर्तन रथांवर हल्ला केला. तेथील गाड्यांची आणि एलईडी टीव्हीची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बंगालचे भाजपचे प्रभारी कैलाश विजय वर्गीय यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणुक आयोगाने बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आणि तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी रात्री ११ वाजता भाजपच्या कडापारा गोडावूनमध्ये घुसून गाड्या फोडल्या, त्यांनी निवडणुक आयोगाला आव्हान दिल्याचा असा दावा त्यांनी केला आहे.

त्याबरोबर एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. मात्र, त्यात कोठेही तोडफोड केली जात आहे अथवा एलईडी टीव्ही चोरुन घेऊन जात असल्याचे दिसून येत नाही. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दरम्यान हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या वेळी ७ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. तृणमूल काँग्रेस गेल्या १० वर्षांपासून सत्तेत आहे. गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस ४४ आणि माकपा यांना २६ जागा मिळाल्या होत्या.