दैवीशक्ती आणण्यासाठी महिलेला अमानुष मारहाण

खेड शिवापूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी एका विवाहीत महिलेला कथित भगत व सासरच्या मंडळीकडून बेशुद्ध होईपर्य़ंत अमानुष मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी येथे घडली.

याप्रकरणी राजगड पोलिसांनी मारहाण करणारा भगत राजू कोंडे, त्याची पत्नी, पीडित महिलेची सासू आणि दिर यांच्यावर जादूटोळा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव आणि राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी पुढाकार घेतला.एका विवाहित महिलेच्या अंगात दैवीशक्ती आणण्यासाठी तिच्या सासरचे लोक तिला आर्वी येथील राजू कोंडे या भगताकडे वारंवार घेऊन येत होते.

प्रत्येक वेळी या महिलेच्या अंगात कुलदैवत आणण्यासाठी कोंडे आणि त्याची पत्नी या पीडित महिलेला वेताची काठी आणि आसुडाने अमानुष मारहाण करत होते. या प्रकाराबद्दल या महिलेच्या माहेरच्या लोकांना समजले. त्यानंतर त्यांनी या पीडित महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यानंतर ‘अंनिस’च्या पुढाकाराने या पीडित महिलेच्या नातेवाइकांकडून राजगड पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार राजगड पोलिसांनी सदर भगत राजू कोंडे, त्याची बायको, या पीडित महिलेची सासू आणि दीर यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दरडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.